शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (12:03 IST)

डर्माटिलोमॅनिया म्हणजे काय?

डर्माटिलोमॅ‍निया हा एक स्किन पिकिंग डिसऑर्डर किंवा एसपीडी आहे. सामान्यपणे तोंडात हात घालून नखे कुरतडणे किंवा बोटे चावत बसणे ही सवय सर्रास पाहायला मिळते. मात्र सामान्य वाटणारी ही समस्या काही वेळा गंभीर परिणाम करणारी असू शकते. यामुळे ग्रस्त असणारी व्यक्ती सतत त्वचेला स्पर्श करते, रगडते, खाजवते, बोचारते आणि त्वचा ओढून काढते. असे मानले जाते की व्यक्तीमध्ये असलेली स्वहीनतेच्या भावनेपोटी किंवा इतर काही कारणांमुळे अशा प्रकारचा व्यवहार करते. त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो. त्वचेवर जखमाही होतात. 
 
स्वतःचे नुकसान : या डिसऑर्डरमुळे व्यक्ती स्वतःच्या त्वचेचे नुकसान करु शकते. भीती, घाबरणे, उत्साह आणि कंटाळा यासारख्या परिस्थितीतही लोक अशा प्रकारची वर्तणूक करतात. सतत आणि आवेगात केल्या जाणार्‍या या कृतीमुळे त्वचेच्या पेशींचे गंभीर नुकसान होते. अनेक संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की डर्माटिलोमेनिया ट्रिचोटिलेमेनिया म्हणजे स्वतःचेच केस ओढण्याच्या समस्येशी ही समस्या मिळतीजुळती आहे.
 
संसर्गाचा धोका : सतत एका जागी खाजवत राहिल्याने रुग्णाला संसर्गाचा धोका असतो. कारण अनेक लोक त्वचा काढण्यासाठी चिमटा किंवा टोकदार वस्तूचा वापरही करतात. त्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्याचा धोका असतो. अनेकदा समस्या इतक्या वाढतात की त्वचेचे ग्राफ्टिंग करण्याची गरज भासते. डर्माटिलोमेनियाचा मानसिक रुपातही प्रभाव पडतो कारण रुग्णाला असहाय वाटू लागते त्याला त्याच्या या वर्तनाची लाजही वाटते. एका संशोधनामध्येही गोष्ट स्पष्ट झाली आहे की डर्माटिलोमेनियाने ग्रस्त 11.5 टे रुग्ण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.
बिहेवियरल थेरेपी उपयुक्त : डर्माटिलोमेनिया विकारासाठी कॉग्रेटिव्ह बिहेवियरल थेरेपी उपयुक्त ठरते. या थेरेपीच्या मदतीने स्कीन पिकिंगची सवय सोडवण्यास मदत होऊ शकते. स्कीन पिकिंग करण्याची इच्छा होणे थांबवण्यासाठी अँटी डिप्रेसंट औषधेही रुग्णांना दिली जातात. आपल्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या मदतीने या समस्येपासून सुटका होऊ शकते. 
 
कमी वयापासूनच होते सुरुवात : लहान मुले एकटी असतात, त्यांना भीती वाटते किंवा उत्साही, आनंदी असतात तेव्हा आपल्या त्वचेला ओचकारतात, खातात. किशोरावस्थेत मुरुम, पुटकुळ्या आदींमुळे त्वचेला ओचकारण्याची समस्या निर्माण होते. किशोरवयातील मुलांना तोपर्यंत त्वचा ओचकारून काढण्याची सवय होते. अनेकदा सोरायसिस आणि एक्झिम यासारख्या त्रासांमुळे त्वचा खाजवणे आणि ओचकारणे अशी सवय होते. पण वयाच्या 30-45 या वयामध्ये मात्र दुसरा टप्पा येतो. त्यात लोक डर्माटिलोमेनियासारख्या त्रासांनी ग्रस्त असतात. या टप्प्यातील ही समस्या होण्यामागे तणाव हे एक सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जाते. 
 
- सत्यजित दुर्वेकर