सोमवार, 20 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
 
ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
 
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
 
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
 
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच !