शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (16:05 IST)

बाळासोबत प्रवास करताय...

आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण आई होण्यासोबतच तुमच्या जबाबदार्‍यांमध्येही नक्कीच वाढ होत असते. एका बाळाच्या आईच्या नात्यात सर्वातआधी तिच्या बाळाचाच विचार येतो. बाळाचं लालनपालन, संगोपन करण्यात ती इतकी व्यस्त होते की कधीकधी तिला तिच्या आजूबाजूच्या जगाचं भानच राहत नाही.

गरोदरपण आणि बाळाच्या जन्माआधी तुम्ही दरवर्षी वेकेशनवर जाता. मात्र बाळ झाल्यावर साधा प्रवासदेखील तुम्हाला नकोसा वाटू लागतो. याचं कारण बाळ झाल्यावर प्रवास करणं फार कठीण आहे हे मनात कुठेतरी बिंबलेलं असतं. मात्र असं मुळीच नाही. कारण तुम्ही तुमच्या बाळासोबत कुठेही बिनधास्त प्रवास करू शकता. बाळ एक ते दोन वर्षांचं झालं की त्याला घराबाहेर फिरायला नेण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे तुमची फिरण्याची आवडही जपली जाते. शिवाय गरोदरपणापासून कमीतकमी एक ते दोन वर्ष तुम्ही फिरणसाठी घराबाहेर पडलेल्या  नसता. यासाठीच बाळासोबत प्रवास कसा एन्जॉय करायचा हे जरूर वाचा. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकता.

बाळासोबत प्रवास करताना फॉलो करा या टिप्स – बाळासोबत प्रवास करणं तेव्हाच सोयीचं होईल जेव्हा तुम्ही प्रवासाला जाण्यापूर्वी या खास टिप्स फॉलो करण्याचा   प्रयत्न कराल.

सार्वजनिक ठिकाणी आणि अति गर्दीच्या ठिकाणी प्रवास करू नका -बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्याला लगेचच कोणतंही इनफेक्शन होऊ शकतं. यासाठीच बाळाला अति गर्दी असलेल्या ठिकाणी फिरण्यास घेऊन जाऊ नका. बाळ खूप लहान असताना विमानाने अथवा कारने प्रवास करण्यास काहीच
हरकत नाही.

विमानप्रवास करताना काळजी घ्या – बर्‍याच पालकांची हिच चूक होते की ते नेहमीप्रमाणे विमानाचं तिकीट बुक करतात. पण त्याआधी बाळाच्या सोयीचा विचार करत नाहीत. जर तुम्ही बाळासोबत विमान प्रवास करणार असाल तर खूप वेळ प्रवास करावी लागणारं विमान अथवा रात्री उशिराचा प्रवास करणे टाळा. कारण यामुळे तुमच्या बाळाच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच विमानाचं तिकीट काढण्यापूर्वी तुमच्या बाळाच्या झोपेच वेळापत्रकाचा अंदाज घ्या.

दोन वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी वेगळे तिकीट बुक करा- सार्वजनिक ठिकाणी लहान बाळासाठी प्रवास विनामूल्य असतं. पण जर तुमचं बाळ बसू शकत असेल तर त्याच्यासाठी एक तिकीट आणखी बुक करा. कारण त्यामुळे तुम्हाला त्याला अंगावर घेऊन प्रवास करावा लागणार नाही. थोडावेळ प्रवासात आराम मिळण्यासाठी ही एक सोपी युक्ती जरूर फॉलो करा.

प्रवासात रेस्टरूमचा वापर करा-विमान प्रवास असो अथवा इतर कोणताही बर्‍याच   ठिकाणी आजकाल रेस्टरूममध्ये बाळासोबत असलेल्या आईसाठी खास सोय केलेली असते. या सोयीचा फायदा घ्या. बाळाचे कपडे बदलण्यासाठी, स्तनपान देण्यासाठी तुम्हाला या सोयींचा फायदा होऊ शकतो.

बाळ आजारी असताना अथवा त्याचे त्याचे लसीकरण झाल्यावर प्रवास करू नका - बाळ जर आजारी असेल तर ते चिडचिड  करतं. कधी कधी बाळाला लस दिल्यावर   दोन ते चार दिवस ते खूप चिडचिड करतं. म्हणूनच या काळात प्रवास करू नका. कारण यामुळे तुमचा प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता असते. यासाठीच प्रवासाला जाण्याआधी डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या .

कारने प्रवास करताना काळजी घ्या -जर तुम्ही प्रवास कारने अथवा एखाद्या खासगी वाहनाने करत असाल तर काही बाबतीत विशेष काळजी घ्या. कारमधून प्रवास करताना बाळाला घेऊन मागच्या सीटवर बसा. शिवाय सीटबेल्ट लावण्यास  विसरू नका. कारमध्ये प्रवास करण्यासाठी लहान मुलांसाठी खास सीट मिळतात त्याचा वापर करा. ज्यामुळे तुमचे बाळ आरामात प्रवास करू शकेल. शिवाय जर बाळाला उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला जाण्यापूर्वी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्या.