शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर जोशी (वय-81) यांचे मुंबईत निधन झाले. सुधीर जोशी यांना सुधीरभाऊ या नावाने शिवसेनेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आदराचे स्थान होते.
'संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला' आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय.
सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला.
बाळासाहेब ठाकरे सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी होते.
सुधीर जोशी शिवसेनेत कोणामुळे आले?
सुधीर जोशी हे मनोहर जोशी यांचे भाचे. त्यांच्यामुळेच ते शिवसेनेत दाखल झाले.
ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती तेव्हा या मामा-भाच्यांकडे स्वतःची गाडी होते असे जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी लिहिले आहे.
स्वतःची गाडी नसताना सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे सुधीर जोशींच्या गाडीतून फिरायचे. कधीकधी मनोहर जोशीही गाडीत असायचे. त्यामुळे बाळासाहेब माझा ड्रायव्हर एमए.एलएलबी आहे असा गंमतीनं उल्लेख करायचे. बहुतांशवेळा सुधीरभाऊच गाडी चालवायचे आणि त्यांच्या ड्रायव्हिंगवर बाळासाहेब ठाकरे खुश असायचे असं प्रकाश अकोलकर यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
नगरसेवक, महापौर ते मंत्री
सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले.
1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते...
1968 पासून ते विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला.
युतीच्या पहिल्या सरकारात ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले आणि या चळवळीने जे बळ धरले व यश प्राप्त केले त्यात सुधीर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो.
सुधीर जोशींनी भूषविलेली पदे
अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष.
अध्यक्ष / विश्वस्त - साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय.
कार्यकारी समिती सदस्य- गरवारे क्लब. सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना. विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान.
विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट.
अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना. •
अध्यक्ष - इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना.
अध्यक्ष-कॅनरा बँक कर्मचारी सेना.
अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना.
अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना.