गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (11:58 IST)

या सर्व तमाशापेक्षा देशात हुकूमशाहीच आणा : पोंक्षे

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही फार भयानक आहे, मन विषण्ण करणारी आहे. परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करु लागले तर मग हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे, अशा शब्दांत अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे. 
 
जवळपास एक महिन्याच्या सत्तानाट्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी होत असल्याचे दिसत असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मात्र अचानक खेळाचे फासे उलटे पडले.

शनिवारी सकाळी अचानक राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत देशभरातील राजकीय वर्तुळास चक्रावणारा धक्का दिला. या घडामोडींवर सोशल मीडियावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पोंक्षेंनीही फेसबुकवर 'थर्डक्लास राजकारण' असे लिहित संताप व्यक्त केला.
 
लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. ज्या पक्षाची विचारसणी आपल्याला पटते किंवा ज्या विचारसरणीचे नेते सत्तेत यावे असे आपल्याला वाटते, त्या पक्षाला आपण मत देतो. मात्र निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी जर परस्पर विरोधी विचारसरणीचे पक्ष मिळून सत्ता स्थापन करू लागले तर मग हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. 'थर्डक्लास राजकारण' अशी फेसबुक पोस्ट लोकांच्या मतांचा हा अनादर आहे. ही लोकशाही संपूर्णपणे अपयशी ठरली असे म्हणावे लागेल, असे ते म्हणाले. भाजपने जे केले ते घृणास्पद आहे. एवढ्या पहाटे लपून-छपून शपथविधी पार पाडण्याची गरजच काय? जाहीरपणे आम्ही मतदान केलंय तर सत्तासुद्धा उजेडात जाहीरपणे यावी, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. या सर्व राजकीय खेळापेक्षा देशात हुकूमशाही आणावी, असे मत त्यांनी यावेळी मांडले. हे सगळे पाहून सामान्य माणसाची निराशा झाली आहे. या देशात हुकूमशाही आणावी असे माझे मत आहे. किमान हा सर्व तमाशा तरी होणार नाही. मतदानाचा आणि लोकशाहीचा हा तमाशा बंद करा, असे पोंक्षे म्हणाले.