गरबा खेळणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला , मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. येथे गरबा खेळणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का वडिलांना सहन झाला नाही आणि त्यांचाही मृत्यू झाला आहे. एकाचवेळी पिता आणि पुत्र दोघांचे निधन झाल्याने कुटुंबियांवर मोठेच संकट कोसळले आहे. हे प्रकरण पालघर जिल्ह्यातील विरार शहरातील आहे. येथील गरबा कार्यक्रमात नाचताना एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
विरारच्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विरारमधील ग्लोबल सिटी कॉम्प्लेक्समध्ये गरबा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी मनीष नरपाजी सोनिग्रा हा युवक गरबा खेळत होता. त्याचवेळी तो नाचत असताना खाली पडला. या युवकाला त्याचे वडील नरपजी सोनिग्रा यांनी तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून या युवकाला मृत घोषित केले. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून वडीलही कोसळले. त्यांचाही रुग्णालयातच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.