प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स भीषण अपघातात जखमी
जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स एका भीषण कार अपघातातून थोडकत बचावले आहेत. वुड्स यांच्या कारला लॉस एंजलिसमध्ये अपघात झाला. यात वुड्स यांच्या पायाला इजा झाल्याचे वृत्त असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.
ब्लॅकहॉर्स रोडवरून जात असताना वुड्स यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळली आणि पलटली. कारमध्ये वुड्स एकटेच होते. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असून, वुड्स यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वुड्स यांना रुग्णावाहिकेच्या साहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त आहे.