किमान 10 झाडं लावली तरच मिळणार बंदुकीचा परवाना
पंजाब मधला नवा कायदा. झाडं लावली तरच मिळणार बंदुकीचा परवाना.
बंदुका आणि रोपं या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण आता यापुढे मात्र पंजाबात या दोन्हींचा एकमेकांशी संबंध असेल.
पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यामध्ये बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्या आधी किमान 10 रोपं लावावी लागतात. या नियमाला आता महिना उलटून गेलाय.
"पंजाब्यांना कार्सचं, शस्त्रांचं आणि मोबाईल्सचं वेड असतं. त्यांना आता झाडं लावण्याचंही वेड लागू दे," जिल्ह्याचे आयुक्त चंदर गेंद यांनी बीबीसीला सांगितलं.
परवान्यांसाठी अर्ज करणाऱ्याला या लावण्यात आलेल्या रोपांसोबतच्या सेल्फीजही सादर कराव्या लागत असल्याचं गेंद सांगतात.
"रस्ते रूंद करण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात येते, म्हणूनच असं करणं ही काळाची गरज होती," ते सांगतात.
भारतामध्ये शस्त्रास्त्र परवान्यांबाबत पंजाबचा तिसरा क्रमांक लागतो. सरकारी आकडेवारीनुसार पंजाबमध्ये 3,60,000 परवानाधारक शस्त्रं आहेत.
अनेक जण या परवान्यासाठी अर्ज करतात, पण झाडांसोबतचे सेल्फी दिल्यावर हा परवाना मिळेलच असं नाही. याचा अर्थ इतकाच आहे की तुमच्या अर्जावर 'विचार' केला जातोय.
5 जूनला जागतिक पर्यावरण दिनी हा निर्णय जाहीर करण्यात आला. पण अनेक लोकांनी आता या नियमांची पूर्तता करायला सुरुवात केल्यानंतर मीडियामध्ये याची चर्चा होतेय.
हा नियम अंमलात आणल्यापासून आतापर्यंत किमान 100 लोकांनी सेल्फीजच्या सोबत अर्ज केल्याचं गेंद सांगतात.
पण फक्त रोपं लावून त्यांच्यासोबत सेल्फी घेणं पुरेसं नाही. अर्ज करणाऱ्या या लोकांना एक महिन्यानंतर पुन्हा एकदा सेल्फी पाठवून आपण या झाडांची काळजी घेत असल्याचंही दाखवून द्यावं लागतं.