शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (10:33 IST)

Happy Birthday Rekha रेखा यांना पहिल्या सिनेमाच्या शूटिंगवेळी जेव्हा चुंबनदृश्याचं चित्रीकरण करावं लागलं...

रेहान फझल
22 जानेवारी 1980 चा तो दिवस. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचा तो दिवस होता. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार तिथे उपस्थित होते.
 
अमिताभ बच्चन पत्नी जया आणि आईवडिलांबरोबर समारंभात पोहोचले आणि एका कोपऱ्यात मनमोहन देसाईशी गप्पा मारत होते. जया आपल्या सासूबाई तेजी यांच्याबरोबर बसल्या होत्या.
 
तितक्यात रेखाने अचानक एन्ट्री घेतली. तिने अतिशय सुंदर पांढरी साडी नेसली होती आणि लाल टिकली लावली होती. पण तिच्या भांगातलं कुंकू अनेकांच्या नजरेत भरलं.
 
तिला पाहताच सगळे छायाचित्रकार नीतू आणि ऋषी कपूर यांना सोडून रेखाकडे वळले.
 
लोकांच्या मनात लाखो प्रश्न निर्माण करून रेखा थोड्या वेळातच पार्टीतून निघून गेली.
 
नंतर एका मासिकाला मुलाखत देताना रेखाने सांगितलं की, त्या दिवशी शूटिंग आटोपून थेट पार्टीला आल्यामुळे तिनं कुंकू आणि मंगळसूत्र घातलं होतं.
 
ही होती खरीखुरी रेखा... जिला कायम चर्चेत रहायला आवडायचं, आणि लोकांची तर तिला कणभरही पर्वा नव्हती.
 
भानुरेखा ची झाली 'रेखा'
रेखा यांचं चरित्र, 'रेखा- द अनटोल्ड स्टोरी' लिहिणारे यासेर उस्मान सांगतात की, रेखाच्या कारकिर्दीची सुरुवात 14 वर्षांच्या वयात सुरू झाली.
 
एकदा नैरोबीमधले निर्माता कुलजीत पाल वाणीश्री या तामिळ अभिनेत्रीबरोबर करार करायला जेमिनी स्टुडिओमध्ये आले होते.
 
तेव्हा त्यांनी मेकअप रूममध्ये एक गोल-मटोल सावळ्या मुलीला जेवताना बघितलं. तिची प्लेट पूर्ण भरली होती. कोणीतरी सांगितलं की, ती अभिनेत्री पुष्पवल्लीची मुलगी आहे.
 
कुलजित यांना तिच्यात काहीतरी खास जाणवलं आणि ते संध्याकाळी पुष्पवल्लीच्या घरी पोहोचले. त्यांनी रेखाला विचारलं, "तुला हिंदी बोलता येतं का?"
 
रेखानी तडक उत्तर दिलं - "नाही."
 
तेव्हा त्यांची आई म्हणाली, "माझ्या मुलीची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. तुम्ही तिला एका कागदावर काहीतरी लिहून द्या, ती पाठ करून तुम्हाला लगेच वाचून दाखवेल."
 
कुलजीतने हिंदीत एक डायलॉग लिहिला. रेखाने मग तो रोमन लिपीत लिहिला आणि कुलजीत यांचा चहा संपता संपता रेखा म्हणाली - "सतीश, अब वो दिन आ गया है जब तुम्हारे और मेरे बीच में फुलों का हार भी नहीं होना चाहिए."
 
कुलजीत यांनी तेव्हाच रेखाला आपल्या फिल्मसाठी साइन केलं आणि अशा प्रकारे भानुरेखा नावानं ओळखल्या जाणाऱ्या रेखाचा चंदेरी दुनियेतला प्रवास 'अनजाना सफर' चित्रपटाने सुरू झाला.
 
पहिला धक्का
दिग्दर्शक राजा नवाथे यांनी रेखावर पाच मिनिटांचं चुंबनदृश्य चित्रित केलं, आणि पहिल्याच चित्रपटात ती एक प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडली.
 
यासेर सांगतात, "पहिल्याच शेड्यूलमध्ये कुलजीत, राजा आणि चित्रपटाचा हिरो विश्वजीत यांनी योजना आखली की चित्रपटात एक चुंबनदृश्य असेल. जसं राजा ने अॅक्शन म्हटलं, विश्वजीतने रेखाला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. कॅमेरा सुरूच राहिला. दिग्दर्शक तर थांबलाच नाही पण विश्वजीतसुद्धा थांबला नाही. यादरम्यान युनिटचे लोक मजा बघत होते, शिट्ट्या मारत होते."
 
रेखा ही घटना कधीही विसरू शकली नाही.
 
नंतर 'लाईफ' या प्रसिद्ध मासिकाने जेव्हा चुंबन या विषयावर एक स्टोरी केली, तेव्हा त्यांनी विश्वजीत आणि रेखावर चित्रित झालेली चुंबनदृश्यं प्रकाशित केली. हा चित्रपट रेखा आल्यावर दहा वर्षानी प्रदर्शित झाला आणि चांगलाच आपटला.
 
विनोद मेहरांशी विवाह
'सावन भादो' हा रेखाचा पहिला हिट चित्रपट ठरला. हळूहळू त्यांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळत गेली.
 
एक वेळ अशी होती की रेखाकडे एका वेळेला 25 चित्रपट असायचे. त्याचदरम्यान विनोद मेहरांशी तिची भेट झाली. तो रेखाला आवडू लागला. त्यांनी लग्नसुद्धा केलं. पण विनोद मेहराच्या आईनी रेखाला स्वीकारण्यास नकार दिला.
 
यासेर उस्मान सांगतात, "मी आतापर्यंत रेखाच्या जवळच्या जितक्या व्यक्तींना भेटलो आहे त्यांनी मला सांगितलं की विनोद मेहरांचं रेखावर जिवापाड प्रेम होतं. रेखा त्यांना 'विन' म्हणून हाक मारायची.
 
पण विनोद रेखाशी लग्नासाठी आईचं मन वळवू शकले नाही. जेव्हा कोलकाता येथे लग्न करून एअरपोर्टवरून आपल्या घरी घेऊन गेले, तेव्हा रेखा यांनी विनोद मेहरा यांची आई कमला मेहरा यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी रेखाला चक्क धक्का दिला."
 
"कमला यांनी रेखाला आपल्या घरात घुसू दिलं नाही. एक काळ असा होता की त्या रेखावर इतक्या नाराज होत्या की अगदी तिला चपलेने मारण्याची त्यांची तयारी होती. विनोदने रेखाला काही दिवस आपल्याच घरी राहण्यास सागितलं. तेव्हापर्यंत आपल्या आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो, असं विनोदने तिला सांगितलं. पण हा प्रयत्न कधीच सफल झाला नाही. कालांतराने हे नातं देखील संपुष्टात आलं."
 
अमिताभची एन्ट्री
अमिताभ आयुष्यात आल्यानंतर मात्र रेखाचं आयुष्य पालटलं. तिचा बिनधास्तपणा, उन्मुक्त व्यवहार, मंत्रमुग्ध करणारी अदा यांचं रुपांतर एका गंभीर व्यक्तिमत्त्वात झालं.
 
यासेर सांगतात, "'दो अनजाने' हा या दोघांचा पहिला मोठा चित्रपट होता. तेव्हा अमिताभचा 'दीवार' आला होता, शोलेसुद्धा आला होता. चित्रपट जगतातला उगवता तारा म्हणून अमिताभची ओळख निर्माण होत होती. रेखा अमिताभला पाहताच फिदा झाली होती."
 
"सिमी गरेवाल यांच्या 'रॉन्देव्हू' या टॉक शोमध्ये रेखाने स्वीकारलं की, अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभं राहणं तिच्यासाठी तितकं सोपं नव्हतं. ते सेटवर वेळेवर यायचे, तर रेखा सेटवर उशीरा येण्यासाठी प्रसिद्ध होती.
 
यासेर सांगतात, "अमिताभ यांचा प्रभाव म्हणा किंवा काय, पण रेखा 'दो अनजाने' च्या शूटिंगच्या वेळी सकाळी सहा वाजता सेटवर हजर असायची. 'दो अनजाने'च्या युनिटचे लोक सांगतात की रेखामधला बदल त्यांना स्पष्टपणे जाणवत होता. एक लठ्ठ, अंगप्रदर्शनाची पर्वा न करणारी रेखा आता एक गंभीर आणि परिपक्व अभिनेत्री झाली होती. नावाजलेले चित्रपट निर्माते तिला साइन करत होते."
 
अचानक रेखाच्या अभिनयाची रेंज वाढली होती. 'घर', 'खुबसूरत', 'इजाजत' यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक तिने दाखवली होती.
 
प्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार सांगतात, "ती प्रत्येक भूमिकेला वस्त्राप्रमाणे चढवत होती. एकीकडे 'घर' आणि एकीकडे 'खुबसूरत' बघा. दोन्ही चित्रपट वेगवेगळे होते. 'खुबसूरत' बघून असं वाटतं की ती एखाद्या मुलीचा अभिनय करत आहे."
 
'खुबसूरत'साठी तिला राष्ट्रीय पुरस्कारापाठोपाठ 1981साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला.
 
'घर' चित्रपटाच्या वेळी गुलजार यांनी रेखाला आणि चार स्टंटमेनला सांगितलं होतं, की बलात्काराचं दृश्य वास्तविक दाखवायला जितका उत्स्फूर्तपणा दाखवता येईल, तितका दाखवा आणि रेखानी ज्या पद्धतीने ते दृश्य चित्रित केलं त्यानंतर गुलजारांना ते डब करण्याची गरजच पडली नाही.
 
सिलसिला
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातील रेखा आपल्या कारकिर्दीच्या उत्तुंग शिखरावर होती. त्याच दरम्यान यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन 'सिलसिला' नावाचा चित्रपट तयार केला.
 
यासेर उस्मान सांगतात, "तेव्हा यश चोप्रांचा 'काला पत्थर' फ्लॉप झाला होता आणि अमिताभचेही दोन-तीन चित्रपट चालले नव्हते. यश एक असा चित्रपट बनवू पाहत होते जो प्रेक्षकांना भावेल. अमिताभ 'कालिया'साठी श्रीनगरमध्ये शूटिंग करत होते. यश तिथे पोहोचले आणि त्यांनी 'सिलसिला' चित्रपटाचा प्रस्ताव समोर ठेवला."
 
"रेखा आणि अमिताभ या चित्रपटासाठी तयार झाले. पण जयाला चित्रपटासाठी तयार करणं कठीण होतं. ती जबाबदारी खुद्द यश चोप्रांनी घेतली."
 
"सुरुवातीला जया राजी झाल्या नाहीत. पण चित्रपटाचा शेवट ऐकल्यावर मात्र त्या तयार झाल्या. चित्रपटाच्या शेवटी प्रेयसीला सोडून अमिताभचं पात्र नेहमीसाठी जयाकडे येतं, असं दाखवलं होतं. चित्रपट सुरू व्हायच्या आधी यशने रेखा आणि जयाकडून वचन घेतलं की शूटिंगदरम्यान दोघी कोणतीही अवघड परिस्थिती येऊ देणार नाहीत. दोघींनीही हे वचन पूर्णपणे निभावलं," उस्मान सांगतात.
 
नात्यातली गुंतागुंत
एक वेळ अशी आली जेव्हा अमिताभ रेखाला भेटायला कचरू लागले. एकेकाळी अमिताभचे निकटवर्तीय असलेले अमर सिंह सांगत होते, "एकदा शबाना आझमीने मला, अमिताभ आणि जयाला आपल्या वाढदिवशी बोलावलं. आम्ही तिघं एकाच कारमध्ये बसून त्यांच्या घरी पोहोचलो. अमिताभनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं की आम्हाला बराच वेळ लागेल तर तू जेवून इथे परत ये."
 
"जसं आम्ही खोलीत शिरलो, आम्ही बघितलं की रेखा कोणाशी तरी बाहेर बोलत उभी होती. अमिताभ तिला बघून लगेच मागे फिरले. तेव्हापर्यंत ड्रायव्हरसुद्धा जेवायला गेला होता. त्यामुळे अमिताभ चक्क टॅक्सीनी परत गेला."
 
"आम्ही तिघंही घरी आलो. त्या दोघांमध्ये काहीतरी होतं, नाहीतर शबानाला शुभेच्छा न देता अमिताभ परतला नसता," सिंह यांनी सांगितलं.
 
'उमराव जान' चित्रपटामुळे रेखाने सर्वाधिक नाव कमावलं. प्रश्न असा आहे की, मुजफ्फर अलींनी काय बघून रेखाला या भूमिकेसाठी निवडलं?
 
अली सांगतात, "मी त्या भूमिकेसाठी स्मिता पाटीलची निवड करू शकत होतो. पण काहीतरी हिरावून घेतल्याची भावना मी रेखाच्या डोळ्यात स्पष्टपणे बघू शकत होतो. उमराव जानची पण तीच कथा होती."
 
"रेखानी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. तिनं माझ्या अपेक्षेपेक्षा फारच उच्च कोटीचा आणि स्क्रिप्टच्या वरचढ अभिनय केला."
 
दुसरं लग्न
दिल्लीचे उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखाची 1990 साली भेट झाली. दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
यासेर उस्मान सांगतात, "मुकेश अग्रवाल फार शिकले नव्हते. त्यांची हॉटलाईन नावाची कंपनी होती आणि ते दिल्लीत राहायचे. चित्रपट अभिनेत्यांना आपल्या घरी पार्टी देण्याचा त्यांना शौक होता."
 
"त्यांनी एक घोडा विकत घेतला होता. जेव्हा कोणी पाहुणा त्यांच्या फार्महाऊसवर जायचा, तेव्हा त्या घोड्यावर बसून गेटवर घ्यायला मुकेश स्वत: जायचे."
 
"या उच्चभ्रू वर्गातलं एक प्रसिद्ध नाव बीना रामानी म्हणजे. त्यांनी मुकेश यांची भेट रेखाशी घालून दिली. त्यांना भेटून एक महिनासुद्धा झाला नव्हता की तेव्हाच मुकेशने रेखाला लग्नाची मागणी घातली."
 
"रेखा तयार झाल्या आणि त्यांनी जुहूला मुक्तेश्वर देवालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ते हनीमूनसाठी लंडनला गेले, पण एका आठवड्यातच त्यांना आपण एकमेकांना अनुरूप नसल्याचं लक्षात आलं." असंही उस्मान यांनी सांगितलं.
 
यासेर पुढे सांगतात, "मुकेश निराशाग्रस्त होते. ते रोज त्यासाठी औषध घ्यायचे. एक दिवस त्यांनी पण कबूल केलं की त्यांच्या आयुष्यात पण एक 'एबी' आहे. रेखाच्या एबी बद्दल सगळ्यांना कल्पना होतीच. पण मुकेशच्या आयुष्यातली एबी म्हणजे त्यांची मनोविकार तज्ज्ञ होती."
 
"त्यानंतर रेखा आणि मुकेशमधलं अंतर वाढत गेलं. सहा महिन्यांमध्येच रेखाने घटस्फोटाचा निर्णय घेतला. या घटनेने मुकेश यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली."
 
आज रेखानी स्वत:ला सुचित्रा सेनच्या रूपात ढकललं आहे. त्या आता एकाकी जीवन जगते आहे. त्यांनी आयुष्याचा सामना चिकाटीने केला आहे. अनेकदा आयुष्यात पडझड होऊनसुद्धा कोणाच्या मदतीशिवाय त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना कायमच वाळीत टाकलं, पण इतिहास असं करणार नाही, अशी अपेक्षा.

Published By -Smita Joshi