शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (17:51 IST)

नागपुरातही ओमिक्रॉनचा शिरकाव ,40 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली

महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरसचे ओमिक्रॉन व्हेरियंट, आता हळूहळू पसरत आहे. आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचे प्रकरण नागपूर, महाराष्ट्रामध्ये देखील नोंदवले गेले आहे. नागपुरात एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नागपुरातील ओमिक्रॉन व्हेरियंटची ही पहिलीच घटना आहे आणि यासह महाराष्ट्रात आतापर्यंत या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे.
 
नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रकरणा बाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात ओमिक्रॉनची लागण झालेली व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून दिल्लीमार्गे नागपुरात पोहोचली होती. 6 डिसेंबर रोजी विमानतळावरच ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती, त्यानंतर त्याचा नमुना एनआयव्हीकडे पाठवण्यात आला होता. NIV कडून आज म्हणजेच रविवारी अहवाल आला, ज्यामध्ये हा 40 वर्षीय व्यक्ती ओमिक्रॉन संक्रमित असल्याचे आढळून आले.
शनिवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ओमिक्रॉनचे प्रकरण समोर आल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नागपुरातील प्रकरणानंतर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. यातील 7 जणांना शुक्रवारीच बरे होऊन घरी सोडण्यात आले. म्हणजेच आता राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 11 झाली आहे.
नागपूर हे महाराष्ट्रातील पाचवे क्षेत्र आहे जिथे कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार पोहोचले आहे. यापूर्वी महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाने दार ठोठावले आहे. आतापर्यंत मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुण्यात 1 आणि कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉन व्हेरियंटचा   1 रुग्ण आढळून आला आहे. दुसरीकडे, नागपुरातही रविवारी एक व्यक्ती त्याच्या विळख्यात आली आहे.