बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (13:25 IST)

महागाईची नवीन आकडेवारी तुम्हाला दिलासा देणारी आहे?

- आलोक जोशी
महागाईची ताजी आकडेवारी प्रसिद्ध झालीय. जून महिन्यात चलनवाढीच्या दरात म्हणजेच महागाईमध्ये अल्पशी घसरण नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात 6.3% असणारा हा दर कमी होऊन जूनमध्ये 6.26% झालाय. पण सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून पाहता, ही फार मोठी बाब नाही.
 
पण अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारे तज्ज्ञ या आकड्यांमुळे आनंदात आहेत. कारण यापैकी बहुतेकांनी महागाईचा दर फार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती.
 
महागाईचा दर हा 6.5 ते 6.9% असेल असा अंदाज विविध चॅनल्स - वर्तमानपत्रं आणि एजन्सींनी व्यक्त केला होता. म्हणूनच ही आकडेवारी हा या सगळ्यांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्का होता. खरंतर महागाईचा दर अजूनही रिझर्व्ह बँकेने ठेवलेल्या 4 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेच्या वरच आहे.
 
म्हणूनच या बातमीमुळे रिझर्व्ह बँकेची महागाईबद्दलची काळजी संपुष्टात येणार नाही. पण बहुतेक तज्ज्ञांच्या मते पुढच्या महिन्याच्या धोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक इतर बँकांसाठीचे व्याजदर वाढवण्याचा विचार करणार नाही.
 
पण ही आकडेवारी आहे किरकोळ महागाईच्या दराची म्हणजेच Retail Inflation. हा दर जूनमध्ये कमी झालाय.
 
पण खाद्यपदार्थांच्या दरांतली महागाई पाहिली तर हा आकडा या महिन्यातही वाढलेला आहे. हा दर 5.01% वरून वाढून 5.15% झालाय.
 
भाज्या - फळांच्या किंमतींवर किती परिणाम?
आपल्याला दरांतली वाढ जेव्हा दिसते, तेव्हा वर्षभरापूर्वीच्या याच काळातल्या किंमतींशी त्यांची तुलना करण्यात आलेली असते. आणि गेल्या वर्षीच्या मे महिन्यात खाद्यपदार्थ्यांच्या किंमतींचा महागाईचा दर 9.2% आणि जून महिन्यात 8.45% होता. म्हणजे आधीच भरपूर वाढलेल्या किंमतीच्या वर झालेली ही वाढ आहे.
 
गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत महागाईचा हा दर पावणे नऊ टक्क्यांपेक्षा खाली आला नव्हता. उलट सप्टेंबरमध्ये हा दर 10.68 आणि ऑक्टोबर 2020मध्ये 11.07% पर्यंत हा दर गेला होता. म्हणजे आता जो काही दर सांगण्यात येईल तो याच्याआधारे असेल.
 
खाद्यपदार्थांच्या किंमती पाहिल्या दर तांदळाच्या महागाईच्या दरात काही घसरण झाली आहे आणि भाज्यांचा महागाईचा दर तर शून्याखाली 0.7% म्हणजे ऋणात्मक झालाय. याचा अर्थ भाज्यांचे दर गेल्या वर्षीच्या (2020) याच महिन्याच्या तुलनेत काहीसे कमी झाले आहेत.
 
दूध आणि साखरेतली महागाईही कमी झालीय. पण हे दुधाचे दर वाढण्याआधीचे आकडे आहेत. पण दुसरीकडे डाळींच्या किंमती 10%, फळांच्या किंमती 11.82%, अंड्यांचा महागाई दर सुमारे 20% वाढलाय.
 
खाद्यतेलाच्या किंमतींतली महागाई धोक्याच्या पातळीच्या बऱ्याच वर 34.78% वर आहे.
 
खाद्यपदार्थांच्या किंमतींसोबतच चिंतेच्या आणखी काही गोष्टी आहेत.
 
आरोग्य सुविधांसाठीच्या महागाईचा दर 7.71%, इंधन आणि विजेच्या दरांचा महागाईचा दर 12.68% वर आहे.
 
वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रासाठीचा महागाईचा दर 11.56% आहे.
 
इंधन आणि वाहतूक या दोन्ही क्षेत्रांसाठीचा महागाईचा हा आकडा धोकादायक आहे कारण यामुळेच पुढे जवळपास प्रत्येक क्षेत्रातली महागाई वाढते.
 
पण सरकारला याविषयी माहित नाही, अशातली बाब नाही. सरकारला याबद्दल खबरदारीचा इशारा देण्यात आला नव्हता, असंही नाही.
 
पण यानंतरही ज्याप्रकारे पेट्रोल - डिझेलच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत, त्यावरून पुढच्या काही महिन्यांमध्ये महागाईचं चित्रं काय असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.
 
महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवण्याचा पर्याय वापरते. पण कोरोनाच्या जागितक साथीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधाराची गरज असल्याने यावेळी तेही करता येणार नाही. व्याजदर वाढवले, तर आता कुठे पुढे सरकू लागलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाड्याला पुन्हा खीळ लागेल.