शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 23 मे 2022 (11:55 IST)

दिलासादायक बातमी ! खाद्य तेल स्वस्त

edible oil
देश सध्या वाढत्या महागाईशी झुंज देत आहे. आगामी काळात भारतातील सर्वसामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. विक्रमी उच्चांक गाठलेल्या खाद्यतेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे.  पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियाने निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
त्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या आघाडीवर लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. इंडोनेशियाने गुरुवारी पामतेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली. सोमवारपासून ही बंदी उठवली जाणार आहे.  भारत हा सध्या इंडोनेशियाकडून पामतेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे. भारत इंडोनेशियाकडून दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष टन पाम तेल खरेदी करतो. 
 
भारतीय बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या एकूण वापरामध्ये पाम तेलाचा वाटा सुमारे 40 टक्के आहे. दुसरीकडे, इंडोनेशिया दरवर्षी सुमारे 4.8 दशलक्ष टन पाम तेलाचे  उत्पादन करतो. 750 लाख टनांच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी हे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. पाम तेल हे इंडोनेशियाच्या कमाईचे सर्वात मोठे स्त्रोत आहे. पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता ते त्यांच्या देशात साठवण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडोनेशियाने 28 एप्रिल रोजी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. आता महिनाभरातच हा निर्णय फिरवला आहे.