कर्जदारांना दिलासा, हफ्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
आरबीआयने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. हफ्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले.
सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल.
करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.
रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे.