शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (09:30 IST)

मोहन भागवत: 'सर्व भारतीयांचा डीएनए एकच, मग ते कोणत्याही धर्माचे असो'

भारतीय कोणत्याही धर्माचे असले तरी, त्या सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटलं.
 
"भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशामध्ये हिंदू किंवा मुस्लीम अशा कोणत्याही एका धर्माचं प्रभुत्व असू शकत नाही," असंही ते म्हणाले.
 
"मुळात हिंदू- मुस्लिम एकता भ्रामक आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहे. केवळ पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही," असं मत भागवत यांनी मांडलं.
 
 
मॉब लिंचिंग वर काय म्हणाले भागवत?
या दरम्यान भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेले लोक हे, हिंदुत्वाचे विरोधक," असल्याचं ते म्हणाले.

"मुस्लिमांनी इथं राहायला नको असं जर एखादा हिंदू म्हणत असेल तर ती व्यक्ती हिंदू नाही. गाय ही नक्कीच पवित्र आहे, पण त्यासाठी जे लोक इतरांना मारत आहेत, ते हिंदुत्व विरोधी आहेत. कायद्यानं कोणताही पक्षपात न करता त्यांच्या विरोधात काम करायला हवं," असंही भागवत म्हणाले.
 
'देशावर हिंदू किंवा मुस्लीम कोणाचंही प्रभुत्व असू शकत नाही'
"राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा महिमा हा ऐक्याचा आधार असायला हवा. आपण लोकशाही देशात राहतो. याठिकाणी केवळ भारतीयांचं प्रभुत्व असू शकतं, हिंदू अथवा मुस्लिमांचं नाही,'' असं मोहन भागवत म्हणाले.
 
"काही अशा गोष्टी आहेत, ज्या राजकारणाद्वारे शक्य नाहीत. राजकारण लोकांना एकत्र आणू शकत नाही. लोकांना एकत्र आणण्याचं माध्यमही राजकारण बनू शकत नाही. उलट राजकारण हे एकता भंग करणारं शस्त्र ठरू शकतं," असं मत भागवतांनी व्यक्त केलं.
 
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे सल्लागार राहिलेले डॉक्टर इफ्तिखार हसन यांच्या "वैचारिक समन्वय- एक व्यावहारिक पहल" या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी गाझियाबादमध्ये मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी ही मतं मांडली.
 
देशात धर्मांतराचा मुद्दा तापलेला आहे. त्याच्याशी संबंधितांवर कारवाईचे निर्देश उत्तर प्रदेशात योगी सरकारनं दिले आहेत, नेमकं अशा वेळी हे वक्तव्य आलं आहे.