1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (13:45 IST)

पाकिस्तानाने केलं योगी आदित्यनाथांचं कौतुक

लोकसंख्येनुसार भारतातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशने करोना संसर्गावर ज्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं, त्याचं पाकिस्तानातही कौतुक करण्यात आलं आहे. 
 
उत्तर प्रदेशसारख्या सर्वांत मोठ्या राज्यात करोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'चे संपादक फहाद हुसैन यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.
 
'डॉन'चे संपादक फहाद हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान करोना हाताळण्यासाठी कसा संघर्ष करत आहे यावर हुसैन यांनी एक दिवस अगोदरच लेख लिहिला होता. त्यानंतर एका ट्वीटद्वारे त्यांनी यूपीचं कौतुक केलं.
 
पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पण उत्तर प्रदेशने लॉकडाऊनचं कसं काटेकोर पालन केलं आणि पाकिस्तानला अपयश आलं, असं फहाद हुसैन म्हणाले.
 
हुसैन यांनी रविवारी सकाळी एक आलेख शेअर केला, ज्यात उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना केली होती. या आलेखानुसार पाकिस्तानची लोकसंख्या २०.८ कोटी, तर यूपीची लोकसंख्या २२.५ कोटी आहे. पण भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये मृत्यू दर हा यूपीपेक्षा सात पट जास्त असल्याचं दाखवण्यात आलं आहे.