रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (21:39 IST)

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार

नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात आल्या असून २६, २७ व २८ मार्च रोजी संमेलन पार पडणार आहे. या तारखा व संमेलनाध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या अर्थात रविवारी  सायंकाळी होणार आहे.
 
साहित्य संमेलना संदर्भातील साहित्य महामंडळाच्या बैठकांचे सत्र शनिवारी शहरात सुरू झाले. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, मिलिंद जोशी, उषा तांबे यांच्यासह आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले, मुकुंद कुलकर्णी व प्रा. डॉ. शंकर बर्‍हाडे यांच्यात बैठक झाली. बैठकीच्या पहिल्या सत्रात संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. प्रारंभीपासूनच संमेलनासाठी मार्चच्या अखेरच्या आठवड्यातील तारखा चर्चेत होत्या. मात्र दि.२८ मार्च रोजी होळी येत असल्याने त्याबाबत पुन्हा विचारविनिमय झाला व अखेरीस याच तारखा निश्चित करण्यात आल्या.
 
या बैठकीत ग्रंथदिंडी, कविसंमेलन, संमेलनातील परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम या बाबींचा कच्चा आराखडाही निश्चित करण्यात आला. त्याला रविवारी होणार्‍या अध्यक्ष निवड व अन्य समित्यांच्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.