बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)

राज्याला अवकाळी पावसाचा फटका, शेतीचे मोठे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला गुरुवारी भल्या पहाटे आणि सकाळी अवकाळी पावसाने झोडपले. मुंबईलाही या अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी संध्याकाळी उशिराने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात काहीसा मुसळधार पाऊस पडला. तर मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, चेंबूर, मालाड आदी परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. तर मुलुंड, घाटकोपर परिसरात काहीसा वाऱ्याचा जोर वाढल्याचे सांगण्यात आले.
 
वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक भागात मोठे नुकसान झालेले पहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईनही विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायर्समध्ये घर्षण होऊन अनेक ठिकाणी स्पार्किंग सुरु झाले आहे. त्यामुळे वाशी पासून पुढील काही स्थानकात वाहतूक विस्कळीत झाले आहे. वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला पहायला मिळत आहे. हार्बरच्या मानसरोवर स्थानकात ओव्हर हेड वायर्समध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बिघाड आला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने ओव्हर हेड वायर्सचे घर्षण होऊन स्पार्किंग सुरु झाले त्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. 
 
रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांसह तुफान पाऊस पडला. गुरुवारी सकाळी सिंधुदुर्गातील अनेक तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याचा मोहोर गळून पडला. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारा पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर सांगलीतल्या अवकाळीच्या धुमाकुळाने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. परभणीतल्या पावसाने ज्वारी, हरभरासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
उस्मानाबादमध्ये पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट, तेल्हारा भागात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी बरसणार्‍या पावसामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.
 
बागलाण तालुक्यातील अंतापूर परिसरात गुरुवारी पाच वाजता अचानक वादळी वार्‍यासह गारपिटीचा पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची पात पूर्णत: भुईसपाट झाली आहे. हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.