मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (21:17 IST)

ओमिक्रॉन : गंगासागर मेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो का?

कोलकाता हाय कोर्टाकडून सशर्त परवानगी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सागरबेटात गंगासागर मेळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र हा उत्सवही कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर' इव्हेंट ठरू नये, अशी भीती आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
 
त्यामागचं कारण म्हणजे, राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे आणि यावर अंकुश लावण्यासाठी सरकारनं आधीच 15 जानेवारीपर्यंत अनेक प्रकारचे निर्बंध जाहीर केले आहेत.
 
विशेषतः राजधानी कोलकाता आणि त्याला लागून असलेल्या उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातली परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी रोज हजारो नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (9 जानेवारी) कोरोना संसर्गाची सुमारे 19 हजार नवी प्रकरणं समोर आली आहेत.
 
या मेळ्याचं अधिकृत उद्घाटन 10 जानेवारीला होणार आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार 16 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात पाच लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.
या बेटावर गंगा नदी बंगालच्या खाडीला मिळते. 'सारे तीरथ बार-बार, गंगासागर एक बार' असं याबाबत म्हटलं जातं. दरवर्षी देश-विदेशातील लाखो लोक या मेळ्यात येत असतात. संगमामध्ये स्नानानंतर लोक या ठिकाणच्या कपिलमुनी मंदिरात दर्शनासाठी जातात.
 
हाय कोर्टाची सशर्त परवानगी
बंगालमधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, अभिनंदन मंडल या डॉक्टरनं गंगासागर मेळा रद्द करण्याबाबत कोलकाता हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
त्यावर सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं कोरोना प्रोटोकॉलचं पालन करत गंगासागर मेळ्याचं आयोजन केलं असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं. मेळ्याची संपूर्ण तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळं अखेरच्या क्षणी मेळा रद्द करणं योग्य नसल्याचं सरकारचं म्हणणं होतं.
 
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शुक्रवारी (8 जानेवारी) न्यायालयानं या मेळ्यासाठी सशर्त परवानगी दिली होती.
 
न्यायालयानं सरकारला मेळ्याच्या परिसराला 24 तासांमध्ये अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्याबरोबरच निगराणीसाठी तीन सदस्यीय समिती तयार करण्याचे निर्देश दिले होते.
 
मेळ्यामध्ये 16 जानेवारीपर्यंत सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांचं पालन होईल याकडे लक्ष द्यावं असे निर्देश मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती केडी भुटिया यांच्या खंडपीठाने गृहसचिवांना दिले होते.
 
राज्य सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांचं पालन होत आहे किंवा नाही, यावर तीन सदस्यीय समिती निगराणी ठेवेल. त्यात निष्काळजीपणा झाल्यास समितीला मेळा बंद करण्याची शिफारस करण्याचा अधिकारही असेल.
 
सरकारला रोज जाहिरातीच्या माध्यमातून मेळ्यामध्ये येणाऱ्या लोकांना धोक्याची पूर्वकल्पना द्यावी लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. सरकारनं यापूर्वीच कोणत्याही धार्मिक सोहळ्यासाठी पन्नासपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध लादले आहेत.
 
शंका आणि शक्यता
हाय कोर्टाच्या सशर्त परवानगीनंतरही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजकीय तज्ज्ञांनी मेळ्याच्या आयोजनामुळं संसर्ग वेगानं पसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे
गेल्यावर्षी हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्याप्रमाणे यावेळी गंगासागर मेळा कोरोनाचा सुपर स्पेडर इव्हेंट ठरू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
"हे मतांचं राजकारण आहे. एकीकडे सरकार सोशल डिस्टन्सिंगवर जोर देत आहे. तर दुसरीकडे मेळ्यात पाच लाख लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्यावर्षी कुंभमेळ्यानंतर निर्माण झालेली स्थिती आपण पाहिली आहे. हा मेळाही सुपर स्पेडर ठरू शकतो," असं पश्चिम बंगाल डॉक्टर्स फोरमचे सचिव डॉ. कौशिक चाकी यांनी म्हटलं.
 
"संसर्गाची सध्याची स्थिती लक्षात घेता यावर्षी गंगासागर मेळा रद्द करायला हवा होता. मेळ्यामुळं संसर्ग अनेक पट वेगानं पसरण्याची शक्यता आहे, असं आरोग्य तज्ज्ञ डॉ. अरिंदम विश्वास म्हणाले. तर डॉ. कुणाल सरकार यांनीही याचा संबंध मतांशी जोडला. धर्म आणि राजकारणाच्या विलणीकरणाचा हा प्रकार असल्याचं ते म्हणाले.
 
सरकारचा दावा
राज्य सरकारनं मात्र मेळ्यात कोरोना संसर्गाच्या सुरक्षेची व्यवस्था काटेकोरपणे केली असल्याचा दावा केला आहे. तसंच कोरोना प्रोटोकॉलचं कठोर पालन केलं जात आहे, असंही म्हटलं आहे.
"मेळ्यामध्ये कोरोना तपासणीची व्यवस्था आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर कुणालाही मेळ्यात किंवा परिसरात जाता येणार नाही. 55 खाटांचं एक तात्पुरतं रुग्णालयही तयार करण्यात आलं आहे. तिथं सीसीयू आणि आईसीयूचे प्रत्येकी पाच बेड आहेत. मेळ्यात आवश्यक संख्येत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही तैनात करण्यात येत आहेत," असं आयोजकांमध्ये समावेश असलेले अधिकारी म्हणाले.
 
मात्र, डॉक्टर्स फोरमचे सचिव कौशिक यांनी एवढ्या छोट्या जागेत पाच लाख लोक जमल्यास सोशल डिस्टन्सिंग कसं शक्य होईल? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
 
संसर्गाची सध्याची परिस्थिती
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहे. शनिवारी (8 जानेवारी) सायंकाळी आरोग्य विभागाच्या वतीने एक बुलेटिन जारी करण्यात आलं. त्यात गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 19 हजार नवीन संसर्गाची प्रकरणं समोर आले असून 19 जणांचा मृत्यू झाल्याचं सांघण्यात आलं. एकट्या कोलकात्यातून सात हजार नवे रुग्ण समोर आले आहेत.
आता राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्येही संसर्ग वाढत आहे. ज्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात गंगासागर मेळा आयोजित केला जात आहे, त्याठिकाणीही संसर्ग असलेल्यांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे.
 
मग मेळ्यात येणाऱ्यांना संसर्गाची भीती नाही का?
 
"भीती कशाची? आम्ही लस घेतली आहे. आता हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट (ओमिक्रॉन) तेवढा धोकादायकही नाही. आम्ही पुण्याच्या कामासाठी आलो आहोत. त्यामुळं कोरोनाची भीती वाटत नाही," असं उत्तर प्रदेशच्या बस्तीमधून सहकुटुंब मेळ्यात आलेले अरविंद कुमार यांनी म्हटलं.
 
बिहारच्या सहरसामधून आलेले गौरीशंकर पांडेदेखील असंच म्हणाले. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेळा 16 जानेवारीपर्यंतच चालणार आहे. मात्र त्याचा परिमाण जवळपास एक आठवड्यानंतर समोर येऊ शकतो.
 
"कुंभमेळ्याप्रमाणे हा मेळाही सुपर स्प्रेडर ठरला तर राज्यात आरोग्य व्यवस्था कोसळू शकते. आधीच एक हजारपेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे," असं एक सरकारी डॉक्टर नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले.