रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (15:20 IST)

नवसाला नक्कीच पावणारा मारूती म्हणून भद्रा मारुतीची ओळख : शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची मूर्ती

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.
 
खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला ‘रत्‍नापूर’नावाने देखील ओळखले जाते. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.
 
खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातीलअलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.
 
खुल्ताबादचं मूळ नाव भद्रावती
खरं तर खुल्ताबादचं मूळ नाव भद्रावती. रत्नापूर म्हणून देखील खुल्ताबादला ओळखलं जात होतं. येथे असलेलं हे हनुमानाचे प्राचीन मंदीर. शयनावस्थेत असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदीर. वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे मंदीर आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि नवसाला पावणारा मारूती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची भारतात फक्त तीन मंदिरे आहेत. एक खुल्ताबादमधील भद्रा मारूती. दुसरे प्रयगाराजमधील मंदीर आणि तिसरे मध्यप्रदेशमधील जाम सवाली येथील मंदीर.
भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. आणि ते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी भव्य योगमुद्रा धारण केली त्यालाच 'भावसमाधी' म्हणतात. राजा भद्रसेनाने त्याचे गाणे संपवले तेव्हा तो हनुमानाची मुर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. राजाने हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांना कायम तेथे वास्तव्य करण्याची मागणी केली तेव्हापासून हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे. तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखलं जाऊ लागलं अशी आख्यायिका आहे.
 
तसं बघितलं तर हनुमान जयंती चैत्र पोर्णिमेच्या दिवशी भद्रा मारुतीची जत्रा असते. औरंगाबाद शहरापासून खुल्ताबादपर्यंत भाविक या यात्रेसाठी पायी रांगा लागलेल्या असतात. भद्रा मारुती म्हणजे हनुमान भक्तांसाठी शहराजवळ असलेलं मोठं मंदीर. तसं बघितलं तर खुल्ताबाद औरंगाबादमधून २५ किमी अंतरावर असेल पण हनुमान जयंतीच्या वेळी भाविक तेवढं अंतर चालत जातात. भद्रा मारुती संस्थान म्हणून आजही खुल्ताबादची ओळख प्रसिद्ध आहे.
 
मूळ भद्रावती असलेल्या या गावात मध्ययुगात मुघलांचं शासन होतं. औरंगजेबाने दख्खनमध्ये आल्यावर तो खडकी (सध्याचे औरंगाबाद) येथे वास्तव्याला होता. स्वराज्यावर डोळा ठेवून असलेल्या औरंगजोबाला मराठ्यांनी याच मातीत गाडले पण शेवटपर्यंत स्वराज्यावर ताबा मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. भद्रावती म्हणजे आजच्या खुल्ताबादेच्या मराठी मातीत मुघलांच्या अनेक कबरी आपल्याला दिसतात. आजही त्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देतात.

Edited by: Ratnadeep Ranshoor