बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:29 IST)

इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट सोपी आहे की अवघड?

ऋजुता लुकतुके
ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरण्याचा अनुभव सोपे करणारे काही बदल आयकर विभागाच्या नवीन वेबसाईटमध्ये करण्यात आलेत. यामुळे तुमच्या विवरणपत्राचं प्रोसेसिंग आणि पुढे जाऊन रिफन्ड देण्याची प्रक्रियाही सोपी झालीय, असा अर्थ मंत्रालयाचा दावा आहे.
 
कोरोनामुळे आपलं फॉर्म 16 घेऊन आयकर विवरणपत्र घेण्याचं अख्खं वेळापत्रक सध्या बिघडलं आहे. पण, यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो.
 
कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
 
ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे.
करदात्यांसाठी ऑनलाईन विवरणपत्र भरणं आता सोपं, सुटसुटीत झालं आहे. आधुनिक पद्धतीने स्वत:च्या स्वत: त्यांना विवरणपत्र भरता येईल,' असा दावा प्रत्यक्ष करवसुली मंडळाने केला आहे.
 
यात विवरणपत्र भरल्या भरल्या त्याच पानावर तुम्ही भरलेल्या अर्जाची पोच तुम्हाला दिसेल, शिवाय तुम्ही परताव्यासाठी (refund) अर्ज केला असले तर त्याचं स्टेटसही त्याच पानावर तुम्हाला दिसेल.
 
दुसरं महत्त्वाचं म्हणजे वेबसाईटच्या अनावरणानंतर काही दिवसांतच या सुविधेचं मोबाईल ॲपही सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला आर्थिक विवरणपत्र मोबाईलवर भरणंही शक्य होणार आहे.
 
ही नवीन वेबसाईट कशी काम करेल ते समजून घेऊया…
केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळ हे अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. दोनच दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाने एक अधिकृत पत्रक काढून नवीन वेबसाईट कशी असेल याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार,
 
1. आधुनिक डॅशबोर्ड आणि जलद प्रोसेसिंग
वेबसाईटचा पत्ता बदललेला नाही. तो incometax.gov.in असा जुनाच आहे. पण, या वेबसाईटचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता तुम्ही भरलेला अर्ज आणि या अर्जाचं पुढे काय झालं, तो कुठपर्यंत प्रोसेस झाला आहे, तुमच्या रिफन्ड/परतावा अर्जाचं पुढे काय झालं ही सगळी माहिती तुम्हाला जलद मिळणार आहे.
तुमच्या विवरणपत्राचं प्रोसेसिंगही आता जलद गतीने झाल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रिफन्ड मिळू शकेल. यापूर्वी तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दोन किंवा तीन अतिरिक्त क्लिक्स करावे लागत होते.
2. ITR सॉफ्टवेअर
पाश्चात्य देशांप्रमाणेच भारतातही अधिकाधिक लोकांनी स्वत:चं विवरणपत्र स्वत: भरावं असा अर्थ मंत्रालयाचा प्रयत्न आहे. त्यसाठी नवीन वेबसाईटवर तुमच्या मदतीसाठी जे ITR विवरणपत्र तुम्हाला भरायचं आहे त्याचं एक सॉफ्टवेअर तुमच्या मदतीसाठी असेल.
ते तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची सोप्या शब्दात माहिती करून देईल. त्याच्या मदतीने तुम्ही विवरणपत्र भरू शकाल. सध्या ITR 1,2 आणि 4 साठी हे सॉफ्टवेअर ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात उपलब्ध आहे. पुढे उर्वरित ITR 3, 5 आणि 7 साठीही ते उपलब्ध करून देण्यात येईल. ही सुविधा मोफत असेल.
3. करदात्यांचं प्रोफाईल
आता वेबसाईटवर तुम्हाला तुमचं एक करविषयक प्रोफाईलच बनवता येईल. यामध्ये तुम्हाला पगारातून मिळणारं उत्पन्न, घरातून मिळणारं उत्पन्न, इतर उत्पन्न याची माहिती तुम्ही लिहून ठेवू शकाल. ही माहिती अर्थ मंत्रालयाकडे गुप्त ठेवली जाईल. आणि त्याचा वापर फक्त तुमचं विवरणपत्र भरतानाच होईल. म्हणजे ही महिती विवरणपत्र भरताना आधीच तुमच्या पत्रात भरलेली (प्रीफिल्ड) असेल.
त्यामुळे अर्ज भरताना त्याचा किचकटपणा तुमच्यासाठी कमी होईल. त्यासाठी तुम्ही TDS सर्टिफिकिट, STF स्टेटमेंट्स या प्रोफाईलमध्ये अपलोड केलीत की पुढचं काम ही वेबसाईट स्वत: करेल. कारण, एरवी ही माहिती भरणं अनेकदा करदात्यांना कठीण जातं.
4. नवीन कॉलसेंटर
विवरणपत्र भरताना किंवा ते भरल्यानंतरही तुमच्या काही शंका असतील तर त्यांच्या निवारणासाठी नवीन कॉल सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक समस्यांचं निराकरण हे ऑनलाईन करण्याचा अर्थ मंत्रालयाचा मानस आहे.
त्याचबरोबर नियमितपणे लोकांना येणाऱ्या समस्या, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया हे समजून सांगणारे नवे व्हीडिओ, नवे लेख वेबसाईटवर अपडेट करण्यात येतील. तसंच करदात्यांना ऑनलाईन चॅट सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
5. ऑनलाईन पेमेंट आणि तक्रार निवारण
विवरणपत्र भरल्यानंतर जर तुम्हाला अतिरिक्त आयकर भरायचा असेल किंवा विवरणपत्रातील चूक सुधारण्यासाठी त्यात बदल करायचे असतील किंवा आयकर विभागाच्या एखाद्या नोटिशीला उत्तर द्यायचं असेल तर ही प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे.
तुम्हाला त्यासाठी आयकर विभागाच्या कार्यालयात जायला नको. हे कामही तुम्ही ऑनलाईन करू शकता. फेसलेस म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी संबंध न येता ऑनलाईन मिळणाऱ्या सूचनांचं पालन करत तुम्ही उर्वरित प्रक्रिया पार पाडू शकाल.
ऑनलाईन पैसे भरण्यासाठी नवीन इंटरफेसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग, UPI अशा आधुनिक पद्धतीने तुम्ही पैसेही भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्रातले बदलही करू शकता.