शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 29 मे 2019 (14:01 IST)

उद्दिष्टावर आधारित गुंतवणुकीचा दृष्टिकोन सर्वोत्तम का ठरतो

अगदी पूर्वीपासून भारतीयांकडे ‘चांगली बचत’ करणारे म्हणून बघितले जाते. आणि बचत करून एक मोठी रक्कम उभी करणे चांगली गोष्ट असली, आपले भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक गोष्ट असली तरीही या बचतीला योग्य गुंतवणुकीच्या दिशेला नेले नाही, तर सगळेच निरर्थक आहे.
 
गेल्या काही वर्षांत आपण बचतीच्या मानसिकतेकडून उपभोगाच्या मानसिकतेकडे आलो आहे. आज  लोक भविष्यासाठी बचत किंवा गुंतवणूक वगैरे करण्याऐवजी त्यांचा सगळा पैसा कोणत्यातरी एण्ड ऑफ द सीझन सेलमध्ये खर्च करतात. जे लोक गुंतवणूक करतात, त्यापैकी बहुसंख्यांना एकाच बाबीची चिंता असते आणि तेवढ्या एकाच बाबीसाठी ते गुंतवणूक करतात, ती म्हणजे परतावा. पण खरे तर हा अविचारीपणा आहे आणि याचा तुमच्या संपत्तीवर होणारा परिणाम तुम्हाला हवा असतो त्याच्या बरोबर उलटा होतो. तुमच्या गुंतवणुकींकडे योग्य दृष्टीने बघितल्यास तुम्हाला अखेरीस उत्तम संपत्ती संचय करता येतो, बाजाराचा सर्वाधिक लाभ घेता येतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमची उद्दिष्टे गाठता येतात.
 
तुमच्या गुंतवणुकीतून सर्वाधिक फायदा मिळवण्याचा मार्ग म्हणजे गुंतवणूक करताना उद्दिष्टाधारित दृष्टिकोन ठेवणे. अशा प्रकारे केलेली गुंतवणूक सर्वाधिक यशस्वी होण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे जेव्हा तुम्ही एखादे विशिष्ट उद्दिष्ट ठेवता, तेव्हा ते खास तुमच्या अशा गरजा पूर्ण करण्यासाठी असते. म्हणून तुमची या प्रक्रियेत भावनिक गुंतवणूक होते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही   परिश्रमाने पैसे वाचवता. दुसरे म्हणजे ही प्रक्रिया तुमची जोखीम पत्करण्याच्या तयारी आणि कालकक्षा यांवर अवलंबून असल्याने तुम्हाला तुमच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वांत अनुकूल अशा गुंतवणुकीच्या शिफारशी केल्या जातात. म्हणून जे उद्दिष्टाच्या दिशेने गुंतवणूक करतात ते त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांमध्ये अधिक यशस्वी होतात.
 
उद्दिष्टाधारित गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रथमच तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. “पैसा माझ्यासाठी का महत्त्वाचा आहे” हा प्रश्न स्वत:ला विचारण्यापासून सुरुवात करा. मग एक पाऊल आणखी पुढे टाका आणि तुमची उत्तरे त्यांच्या महत्त्वाच्या क्रमाने लिहून काढा. तुम्हाला साध्य करायची आहेत अशी अनेक उद्दिष्टे असू शकतात. त्या उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अपरिहार्य आहे, कारण, त्यामुळे तुम्हाला तुमची सर्वांत महत्त्वाची उद्दिष्टे निश्चित करता येतील आणि बचतीला प्रभावी वळण देता येईल. एकदा का तुम्ही उद्दिष्टे स्पष्टपणे निश्चित केली की, त्यांचा काळाच्या आधारे संख्यात्मक विचार सुरू करा. 
एकदा तुम्ही उद्दिष्टे निश्चित केलीत की, गरज असते तुमच्या सर्व गरजांसाठी लागणारा पैसा पुरवण्याची. हे एकठोक रक्कम घालून करता येते किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानचा पर्याय स्वीकारून करता येते. पर्याय कोणताही निवडा, महत्त्वाचे आहे ते म्हणजे प्रत्येक उद्दिष्टाच्या जास्तीत-जास्त यशासाठी सातत्याने त्यासाठी पैसा गुंतवत राहणे.
 
तुम्ही उद्दिष्टाधारित गुंतवणुकीचा निर्णय करता तेव्हा काही बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 
● पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही उद्दिष्टासाठी, विशेषत: दीर्घकालीन स्वरूपाच्या उद्दिष्टासाठी, गुंतवणूक करत असाल, तर एखादा मार्ग नफा मिळवून देणारा नाही असा निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. तुम्ही उद्दिष्टाधारित गुंतवणूक चिकाटीने करत राहिलात, तर तुमच्या क्षमतेहून खूप अधिक पैसा तुम्ही भविष्यात खर्च करू शकता हे तुमच्या लक्षात येईल. 
● दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या आयुष्यांमध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे प्रत्येक उद्दिष्टाचे पुन्हा-पुन्हा परीक्षण करत राहणे आणि त्यानुसार फेरनियोजन करत राहणे आवश्यक आहे. आयुष्यातील बदलत्या परिस्थितींमध्ये काही उद्दिष्टे निरर्थक ठरू शकतात. 
● तिसरी गोष्ट म्हणजे, पैशाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे तुमची उद्दिष्टे दुसऱ्या कोणाच्या उद्दिष्टांशी जुळवून बघणे हा निरर्थक प्रकार आहे. 
● चौथी गोष्ट म्हणजे पैशाच्या बाबतीत सल्ले देण्याची वेळ येते तेव्हा ते सगळीकडून येऊ शकतात; कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी, विमा एजंट्स, सल्लागार, नियोजक वगैरे. कोणाचा सल्ला स्वीकारायचा हे चातुर्याने ठरवा. मिळणारा प्रत्येक सल्ला अंमलात आणायचा ठरवाल तर गुंतवणुकीची वेगवेगळी उत्पादने तुम्हाला घ्यावी लागतील. ही सगळीच एकमेकांना पूरक नसतील आणि अखेरीस यातून तुमचे नुकसान होण्याचीच शक्यता अधिक. 

लेखक : अमर पंडित (फाउंडर हॅप्पीनेस फ्रॅक्ट्री)