गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 31 मे 2018 (12:04 IST)

सचिन, द्रविडमुळे माझ्या करिअरचे नुकसान

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंमुळे माझ्या कसोटी कारकिर्दीवर परिणाम झाला, असे मत भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने व्यक्त केले.
 
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याच्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम फारसा फलदायी ठरला नाही. तो नेतृत्व करत असलेला मुंबईचा संघ साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर झाला. सचिन, द्रविड यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंचा रोहितच्या कसोटी कारकिर्दीवर काय परिणाम झाला?, याबद्दल रोहितने मन मोकळे केले आहे.
 
रोहितने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहित म्हणाला, मला 2010 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी होती. पण दुखापतीमुळे मला ती संधी गमवावी लागली. त्यानंतर मात्र मला थेट 2016 साली संधी मिळाली. सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली यांसारखे मातब्बर खेळाडू संघात होते. त्यामुळे माझ्यासारख्या नवोदित खेळाडूला संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागली, असे तो म्हणाला.
 
मी 20व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण कसोटीतील पहिला सामना मी वयाच्या 26व्या वर्षी खेळलो. त्यावेळी मला समजून चुकले की एखादी संधी गेली तर काय होते? संधी गेल्यानंतर मला हेदेखील कळून चुकले की एखाद्या गोष्टीची वेळ यावी लागते. त्यामुळे आता मला संघात स्थान मिळेल की नाही, याचा विचारही करत नाही, असेही तो म्हणाला.
 
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी रोहितला संघातून वगळण्यात आले आहे. त्याबाबत तो म्हणाला की, मी जेव्हा अगदी नवखा होतो, तेव्हा संघ जाहीर होण्याच्यावेळी मी संघात असेल का? याचा मी सतत विचार करत होतो. पण आता मी संघातील स्थानाचा विचार करत नाही. मला संघात स्थान मिळाले, तर मी खेळतो आणि क्रिकेटचा आनंद घेतो. पण विचार करत नाही, कारण त्यामुळे केवळ दडपण येते, असेही तो म्हणाला.