शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (08:25 IST)

बसल्या-बसल्या सतत पाय हलवायची सवय आहे का तुम्हाला? मग हे वाचा

legs
लोक बसल्या बसल्या पाय हलवत असतात, कोणी टेबल वाजवतं तर कोणी झुलत असतं.
अनेकदा आपण असे लोक पाहातो. कदाचित आपणही त्यातलेच एक असतो.
जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असं काही केलं तर घरच्यांकडून ओरडा खावा लागायचा.
 
अशा हालचालींचा अर्थ होता की तुमचं अभ्यासात लक्ष नाही, किंवा तुम्ही चंचल आहात किंवा दुसऱ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी असं काहीतरी करत आहात.
 
अशा हालचालींना इंग्लिशमध्ये फिजिटिंग म्हटलं जातं.
 
फिजिटिंगकडे पूर्वी बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता, पण आता त्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. या संबंधी झालेल्या नवीन संशोधनातून समोर आलंय की चंचलता आपल्याला निरोगी ठेवण्यात, वजन आटोक्यात ठेवण्यात आणि आपला स्ट्रेस मॅनेज करण्यात आयुष्यभर मदत करते.
 
लीड्स विद्यापीठात न्युट्रीशनल डिसीज तज्ज्ञ असणाऱ्या जॅनेट केड यांनी बीबीसीचा कार्यक्रम द इन्फिनीट मंकी केजच्या एका भागात म्हटलं, “जर तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर बसून राहात असाल तर ते चांगलं नाही. जर तुम्ही बसलेले असताना हालचाल करत असाल तर ते तुमच्य आरोग्यासाठी चांगलं आहे.”
 
फिजिटिंग म्हणजे काय?
फिजिटिंग म्हणजे दडपण घेणं, बेचैन असणं असं सहसा समजलं जातं. पण इप्सेन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मेयो क्लिनिकमध्ये मेडिसिनचे प्रोफेसर जेम्स लेवाईन यांचं म्हणणं आहे की शरीराच्या एका भागाची एका लयीत होणारी हालचाल मेंदूतून नियंत्रित केली जाते.
 
फोर्टिस हेल्थकेयरमध्ये नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रॅमचे चेअरमन समीर पारिख यांचं मत मात्र काहीसं वेगळं आहे. त्यांच्या मते फिजिटिंगला चांगलं की वाईट ठरवणं चुकीचं आहे.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की काही बाबतीत फिजिटिंग तुमच्या कामगिरीवर परिणाम करतं आणि तुमच्या कामात चुका होण्याची शक्यता वाढते.
 
डॉ पारिख यांच्या मते शारिरीक आजाराचंही हे लक्षण असू शकतं.
 
ते म्हणतात, “काही लोकांसाठी फिजिटिंग फायदेशीर असू शकतं, पण यावरून आपण पक्कं अनुमान काढू शकत नाही.”
 
मुंबईस्थित मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुक्षिदा सय्यदा यांचंही मत काहीसं असंच आहे.
 
त्या म्हणतात की ज्या मुलांना खेळण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा जागा नसते त्यांच्यात आपल्याला फिजिटिंगसारख्या हालचाली दिसतात.
त्यांच्यामते फिजिटिंग अनेक कारणांमुळे होऊ शकतं. एक म्हणते तुमची नेहमीची सवय असू शकते किंवा कधी कधी तुम्हाला कुठला तरी आजार झाला असला असल्याची शक्यता असते. आणखी एक शक्यता अशी आहे की तुमचं फिजिटिंग तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
स्थुलता आणि फिजिटिंग
 
जगभरात 1975 पासून आतापर्यंत लठ्ठ लोकांच्या लोकसंख्येत तीनपट वाढ झाली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली. यामुळे आपल्या शरीराचं मेटॅबोलिझम मंदावतं. यामुळे आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित होते. यामुळे आपल्या शरीरातली चरबीही काम करू शकत नाही.
 
पण आता याचे पुरावे मिळालेत की फिजिटिंगमुळे आपलं वजन आटोक्यात राहाण्यात मदत होते. कारण यामुळे आपण एका जागी स्वस्थ न बसता हालचाल करत असतो.
 
लेवाईन यांना एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, ऑफिसात काम करणाऱ्या आणि वजन कमी असणाऱ्या लोकांमध्ये जास्त चंचलता दिसून आली. स्थुल लोकांच्या तुलनेत बारीक लोक जास्त काळ उभं राहात होते, आणि दर दिवशी कमी कमी दोन तास आपली जागा सोडून इकडे तिकडे फिरत होते.
 
ते म्हणतात की पाय हलवत राहाण्याच्या हालचालींनी आपण शरीरातली जास्त ऊर्जा खर्च करण्यास मदत करतो.
 
एका लहानशा अभ्यासात 24 लोकांच्या फिजिटिंग हालचालींमध्ये किती ऊर्जा खर्च झाली याचा अभ्यास करण्यात आला. यात असं दिसून आलं की जे लोक न हालचाल करता स्थिर बसून राहातात त्यांच्या तुलनेत फिजिटिंग करणारे लोक 29 टक्के जास्त कॅलरी जाळतात.
 
यातून लक्षात आलं की फिजिटिंगने शरीरातल्या ऊर्जेचं संतुलन राखण्यास मदत होते
 
डॉक्टर सय्यदा म्हणतात की, फिजिटिंगमुळे स्थूलता कमी होऊ शकते असा सल्ला कोणताही डॉक्टर तुम्हाला देणार नाही.
 
त्या म्हणतात, “फिजिटिंग आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे हा व्यायामाला पर्याय असू शकत नाही.
 
वजन नियंत्रित करण्याखेरीज फिजिटिंगचे आणखीही काही फायदे आहेत. ते आपल्या मेंदूसाठीही उपयुक्त ठरू शकतं.
 
फिजिटिंगमुळे दीर्घायुष्य मिळतं?
फिजिटिंगमुळे तुमचं आयुष्य वाढतं याचा काही थेट पुरावा मिळाला नाहीये. पण तज्ज्ञांना वाटतं की तणावामुळे आपलं आयुष्य कमी होतंय. फिजिटिंगमुळे तणाव कमी होतो.
 
एका अभ्यासात 42 लोकांना तणावपूर्ण वातावरणात ठेवलं. त्यांना नोकरीसाठी मुलाखत देण्यास सांगितलं आणि यानंतर त्यांनी इतर लोकांसमोर काही गणितं सोडवायला सांगितली.
 
यात संशोधकांना आढळून आलं की जे लोक फिजिटिंग करत होते, वेगवेगळ्या हालचाली करत होते त्यांना या वातावरणाचा ताण कमी जाणवला.
 
अभ्यासकांना हेही आढळून आलं की सतत बसून शरीराला जे धोके उत्पन्न होतात ते कमी करण्यासाठी फिजिटिंगचा फायदा होतो. सतत पाय हलवल्याने पायाच्या धमन्यांचं रक्षण होतं आणि त्यांचे आजार होत नाहीत.
 
फिजिटिंगला आधी कितीही वाईट समजलं जात असो, जर या हालचाली तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी आहेत तर त्या तुम्हाला करत राहायला हव्यात.
 
लेवाईन म्हणतात, “जर तुम्ही शरीराला कोणतीही नैसर्गिक हालचाल करू द्याल, तर साहाजिकच तुम्ही जास्त खूश, निरोगी राहाल आणि शक्यता आहे की दीर्घकाळ जगाल.”
 
डॉ सय्यदा आणि डॉ पारिख म्हणतात की, फिजिटिंगने शरीराला फायदा होतो की नाही याबद्दल ठोस काही सांगता येत नाही पण कोणत्याही फिजिटिंग करणाऱ्या व्यक्तीला हीन दृष्टीने पहायला नको.
 




Published By- Priya Dixit