गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (13:03 IST)

तोंडाच्या दुर्गंधीवर नैसर्गिक उपचार

Easy Ways to Prevent Bad Breath
खूप पाणी प्यावे: आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायलास आजारी पडणार नाही, असे संशोधनात आढळले आहे. पाणी पिण्याने बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाण्यामुळे तोंडाची स्वच्छता राखण्यास मदत होते. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करते. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या, दाढा यावर प्रहार करीत असतात. कमी पाणी पिण्याने तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियांचे प्रमाण खूप वाढते. ते आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधी तून बर्‍याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.
 
दही: दही खाण्याने ही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यातही बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे बॅक्टीरिया शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. खरं तर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.
 
लिंबूवर्गीय फळे: संत्री किंवा लिंबू हे व्हिटॅमिन 'सी'चे मुख्य स्रोत आहे. त्याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर होते. शिवाय श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री तोंडातील बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावतात. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन 'सी' युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.
 
बडी शेप: जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शेप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर तोंडाचा दुर्गंध घालविण्यात मदत होते. बडीशोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.
 
वेलची: हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपण दुसर्‍यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.
 
लवंग: लवंगात ऍरोमेटिक फ्लेवर असतो, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचा वापर अवश्य करा.
 
दालचिनी: दालचिनीची गोड चव भाज्यांना चव आणते. त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.