शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (22:29 IST)

भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीचे काम पुढे ढकलले

अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल रविवार २६ ते मंगळवार २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी नियमित सुरू राहणार आहे.
 
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीच्या कामासाठी २६ ते २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद करण्यात येणार होता. या पुलावर एकच मार्गिका खुली ठेवली जाणार होती. त्यामुळे या ठिकाणी तीन दिवस अवजड वाहनांना प्रवेशाला बंदी घालून त्यांना पर्यायी मार्गाची व्यवस्था उपलब्ध केली होती.
 
मात्र ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे झाल्याने व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम संबंधीत विभागाकडून पुढे ढकलण्यात यावे असे ठाणे शहर वाहतूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे ही अडचण लक्षात घेता आय.आर.बी. सुरत यांनी वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ते १० दिवस पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवस वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांना करण्यात आलेली प्रवेशबंदी ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.