शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आषाढी एकादशी: वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व

तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर। 
थ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। 
तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी। 
तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।।
 
हे सांगताना संत नामदेव म्हणतात ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे, तेथे यमदूतांचे वास्त्वय असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशीवृंदावन 
 
आहे, त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे. 
 
 
तर संत एकनाथांनी म्हटले आहे- 
 
तुळशीने पान। एक त्रैलोक्यासमान। 
उठोनिया प्रात:काळी। वंदी तुळशी माऊली।।  
मनींचे मनोरथ। पुरती हेचि सत्य। 
तुळशीचे चरणी। शरण एका जनार्दनी।।
 
अर्थात तुळशीचे एक पानही त्रैलोक्यासमान आहे. सकाळीच उठून तुळशीला वंदन करावे, याने सर्व मनोरथ पूर्ण होतात हे सत्य आहे. 
 
तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन याचे खूप महत्त्व आहे. 
 
वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच पण 
 
वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. 
 
भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही 
 
असे वारकरी पंथ सांगतो.
 
तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही. आयुष्यतील कर्तव्य कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करणे 
 
आवश्यक आहे. वारकरी दीक्षा घेताना गळ्यात घातलेली माळ काही कारणामुळे तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालेपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही.
 
तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.  
 
तुळशीचे महत्त्व
तुळस सात्विकतेचं प्रतीक आहे. 
नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख-समृद्धी प्राप्त होते. 
तुळशीचा स्पर्श प्रचंड ऊर्जा देतो. 
ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते. 
तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते. 
 
आयुर्वेदाप्रमाणे-  
तुळशीच्या रोपाच्या ५० मीटर परीघातील हवा अत्यंत शुद्ध राहते. 
सकाळीच या तुळशीसमोर काही वेळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाते.
ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीराला होतो. 
या क्षेत्रात ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने घरात पिसवा, हिवतापाचे जंतू, अन्य साथीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत.
मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणे शक्य होते.