रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (16:39 IST)

लासलगाव : “आपला कांदा आपलाच भाव” या मोहिमेची सुरुवात

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयाचा दर मिळावा यासाठी “आपला कांदा आपलाच भाव” या मोहिमेची  सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधत या मोहिमेचे स्वरूप व दिशा काय असेल हे स्पष्ट केले.
 
कांद्याच्या प्रति एकराच्या उत्पादनास ६५ ते ७० हजार रुपये खर्च येत असताना दरवर्षीच एक दोन महिन्याचा अपवाद वगळता राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असतो सोबतच बेमोसमी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, बोगस कांदा बियाणे तर कधी कधी दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतातच कांद्याचे मोठे नुकसान होत असते.
 
या सर्व संकटावर मात करून मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने नेहमीच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते त्यातच केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळवणे आज पर्यंत शक्य झालेले नसून देशात कांद्याचे ठोस असे कुठलेही धोरण ठरलेले नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यात व देशात “आपला कांदा आपलाच भाव” या मोहिमेअंतर्गत कांद्याला किमान ३० रुपये प्रति किलोचा भाव निश्चित करून द्यावा यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे मागणी केली जाणार असून त्यासाठी राज्यभरातील सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादकांसोबत व इतर राज्यातील कांदा उत्पादकसोबत या अभियाना अंतर्गत संपर्क करून सरकारकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला ३० रुपये प्रति किलो दर देणे का जरुरीचे आहे याबाबतचा सविस्तर लेखी मागणी चा अहवाल दिला जाणार आहे.
 
यावेळी या अभियाना बाबत अधिक माहिती देतांना भारत दिघोळे म्हणाले की देशात प्रत्येक गोष्टीची दर हा उत्पादक हेच ठरवत असतांना यापुर्वी कांदा उत्पादक असंघटित होते म्हणून कांदा दराच्या बाबतीत आजपर्यंत अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण लढा उभा राहिला नाही परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील कांदा उत्पादक आता संघटित होत असून सरकार कांद्याला किमान किमान ३० रुपये प्रति किलोचा दर देत नाही तोपर्यंत हा लढा अविरतपणे सुरूच ठेवतील.
 
याबाबत सातत्याने राज्यात व देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येणार असून सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख, आमदार, खासदार मंत्री, माजी आमदार, खासदार मंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांची या मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष भेट घेऊन कांद्याला प्रति किलो ३० रुपये दर मिळावा हि लेखी मागणी केली जाणार आहे असेही भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.