'बबन' पोहोचला सिंगापूरला
'कस्सं?...बबन म्हणेन तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल ठरत असलेल्या 'बबन'ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचे आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून 'बबन'च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १५ एप्रिल रोजी सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे.
ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. 'बबन' सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. तसेच, वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणा-या मराठी सिनेमाच्या यादीत 'बबन'चा समावेश झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्येदेखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित !