शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (13:12 IST)

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
 
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
 
वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
 
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
 
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
 
कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा
 
_शांताराम नांदगावकर