1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (09:16 IST)

वारलीचा चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन

वारली चित्रकला सातासमुद्रापार नेणारा अनोखा चित्र जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राष्ट्रपती पुरस्कार व पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळविणाऱ्या म्हसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  पश्चात पत्नी पवनी तसेच सदाशिव, बाळू व विठ्ठल ही तीन मुले आणि ताई व वाजी या दोन मुली असा परिवार आहे.
 

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जगमान्यता मिळवून दिली. म्हसे यांना १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तर २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रांमधून वारली संस्कृती, कला याचे अनोखे चित्रण त्यांनी केले. रशिया, इटली, जर्मन, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये म्हसे यांची चित्रकला पोहचली आहे. त्यांच्या वारली पेटिंगवर खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले होते, तर जपानच्या मिथिला म्युझिअमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला.