योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत, बॉलिवूड सेलिब्रेटींना यूपीत गुंतवणुकीसाठी देणार आमंत्रण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर आहे. या दरम्यान योगी आदित्यनाथ बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते.
योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे.
यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला होता.