सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (09:12 IST)

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचं सोमवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ऐसा वासुदेव बोलतो बोल, विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव, अशा संत एकनाथांच्या भारुडांच्या सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनाचं काम डॉ. रामचंद्र देखणे यांनी केलं.
 
पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील नोकरीतून निवृत्तीनंतर डॉ. देखणे यांनी संत साहित्य अभ्यासात झोकून देऊन काम केले. संत साहित्यासह लोक वाङमय व भारुडांचाही त्यांचा अभ्यास होता.
 
त्यांनी ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक ४७ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध संत साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलं होतं.
 
मागील 35 वर्षांहून अधिक काळ संतविचार प्रबोधिनी दिंडीच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसाराचे काम ते करत होते. राज्य सरकारसह विविध संस्थांनी त्यांना शंभरवर पुरस्कार दिले आहेत.