शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (08:26 IST)

प्रो कबड्डी’च्या धर्तीवर इचलकरंजीत आता खो-खो, 22 खेळाडूंचा समावेश

प्रो कबड्डीच्या धरतीवर या वर्षीपासून सुरू होणाऱ्या अल्टिमेट खो-खो या राष्ट्रीय स्तरावरच्या खो-खो स्पर्धेत इचलकरंजीच्या खेळाडूंनी देशपातळीवर दबदबा ठेवला आहे. देशातून निवडल्या जाणाऱ्या सहा संघांमध्ये तब्बल 22 इचलकरंजीच्या खेळाडूंचा समावेश आहे. एकाच शहरातील सर्वाधिक खेळाडू असणारे इचलकरंजी हे  देशातील एकमेव शहर ठरले आहे. खो-खो हा अस्सल भारतीय देशी खेळ अल्टीमेट खो खो च्या माध्यमातून पहिल्यांदाच झगमगीत अशा व्यावसायिक स्वरूपात समोर येत आहे. यासाठी मोठ्या उद्योग समुहांनी संघ विकत घेतले आहेत. तर  खेळाडूंना भरघोस मानधन मिळणार आहे. हे सामने टी. व्ही. वर दाखवले जाणार आहेत. खो-खो ला प्रचंड प्रेक्षक आणि लोकप्रियता मिळणार आहे. अनेक खेळाडू देशातील क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनणार आहेत.
 
इचलकरंजी शहर व परिसराला खो-खो खेळाची पंढरी मानले जाते. खो-खो चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इचलकरंजीतील संघटनांनी अत्यंत परिश्रम घेतले आहे. यामुळेच राज्य आणि देशपातळीवर राज्य संघाचा दर्जा असलेल्या कोल्हापूर असोसिएशनने नेहमीच आपला दबदबा ठेवला आहे. या मान्यतेला बळकटी देणारी घटना घडली आहे. हा दिवस इचलकरंजीच्या खो-खो इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यात येईल.