अष्टगणेश : वक्रतुंड
वक्रतुंण्डावतारश्च देहांना ब्रम्हाधारक:।
मत्सरासुराहंता स सिंहवाहनग: स्मृत:।।
वक्रतुंडावतार हा ब्रह्माचा देह धारण करणारा, मत्सरासुराचा संहारक आणि सिंह वाहन असणारा मानला जातो. देवराज इंद्राच्या आशीर्वादाने मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्याकडून शिव पंचाक्षरी मंत्राची (नम: शिवाय) दीक्षा प्राप्त केली. मत्सरासुराने या मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि 'तुला कुणाचीही भीती नाही' असे वरदान त्याला दिले.
वरदान प्राप्त झाल्यानंतर मत्सरासुराने पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग लोकांवर आक्रमण केले. यामध्ये वरूण, कुबेर आणि यम देवांचा पराभव झाला आणि मत्सरासुर स्वर्गाधिपती झाला. मत्सरासुराच्या अत्याचाराला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आदी देव कैलासपती भगवान शंकराकडे गेले आणि मत्सरासुराच्या अत्याचाराचा वृतांत सांगितला तेव्हा शंकराने त्याचा बीमोड करण्याचे आश्वासन दिले.
मत्सरासुराला हे समजल्यावर तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने कैलासावरही आक्रमण केले. त्रिपुरारीने त्याच्याशी युद्ध केले परंतु त्रैलोक्यविजयी दैत्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो कैलासचा स्वामी म्हणून राहू लागला. कैलास आणि वैकुंठाचे शासन आपल्या पुत्राकडे देऊन स्वत: वैभव संपन्न मत्सरावासात राहू लागला. त्याचे शासन अत्यंत निष्ठूर आणि अत्याचारी होते.अनिती आणि अत्याचाराचे आकांडतांडव निर्माण झाले होते. तेव्हा सर्व देव मत्सरासुराचा विनाश करण्याचा मार्ग शोधण्यासाठी एकत्र आले. कोणताही मार्ग सापडत नसल्याचे पाहून सर्वजण अत्यंत दु:खी झाले. त्यावेळी भगवान दत्तात्रय तेथे आले आणि त्यांनी देवांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्राचा उपदेश करण्यासाठी प्रेरीत केले.