Last Modified शनिवार, 6 मार्च 2021 (10:57 IST)
हिच्या कपाळावरचे कुंकू पुसले
किती केविलवाणे अभद्र वाटले..
मनाला किंचितही नाही रुचले
हृदयाला काट्यासारखे
रुतले..
बालपणापासून मुलगी कुंकू लावते
हातात कंकण घालून मिरवते..
सोबत नसतो तिचा नवरा
मातेने दिलेला कुंकवाचा साज
साजरा..
भाळीच्या टिकलीने खुलतो चेहरा
कुंकू कंकण आहे माहेरचा तोरा..
मातेने दिलेले ते अलंकार
आयुष्यभर ती लेवणार..
आहे ते माहेरचं लेणं स्रीच सजणं
नवर्याच्या अस्तित्वाशी नाही देणं घेणं ..
बालपणापासून हक्क आहे कुंकवावर
हातातल्या किणकिणणार्या बांगड्यावर..
आणि तो हक्क ती आजन्म बजावणार!
आजन्म ती कुंकू टिकली लावणार..
-मीना खोंड