सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (09:40 IST)

बोध कथा - सिंह आणि लांडग्याची कहाणी

एकेकाळी सुंदरवन नावाच्या जंगलात एक शक्तिशाली सिंह राहायचा.तो दररोज शिकार करण्यासाठी नदीच्या काठी जात असे. एकेदिवशी नदीच्या काठावरून परत येतांना त्याला वाटेत एक लांडगा दिसतो . लांडगा त्याच्या जवळ येऊन सिंहाच्या पायात लोळ लोळ लोळतो. 
सिंह त्याला विचारतो की अरे ! भाऊ आपण हे काय करत आहात.लांडगा म्हणाला -"आपण तर या जंगलाचे राजे आहात, मला आपला गडी बनवून घ्या. मी पूर्ण मनाने आपली सेवा करेन. ह्याचा मोबदला म्हणून आपण जे काही खाणार त्यामधून जे शिल्लक राहील मी तेच खाणार."
 
सिंहाने त्या लांडग्याची गोष्ट ऐकली आणि त्याला गडी म्हणून ठेवले. आता जेथे जेथे सिंह जायचा तो लांडगा देखील त्याच्या सोबत जायचा.असं करून दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. लांडगा सिंहाने केलेली शिकार खाऊन लठ्ठ आणि बळकट झाला होता. 
एके दिवशी लांडग्याने सिंहाला म्हटले की आता मी देखील आपल्या प्रमाणेच बळकट झाला आहे. आज मी त्या हत्तीवर हल्ला करेन आणि त्याला ठार मारेन. तो मेल्यावर मी त्याच्या मासाचे भक्षण करेन. मी खाऊन झाल्यावर जे काही शिल्लक राहील ते तू खाऊन घे. सिंहाला वाटले की हा लांडगा थट्टा करीत आहे." परंतु लांडग्याला आपल्या सामर्थ्यावर अभिमान झाला होता. तो झाडावर चढून बसला आणि हत्ती येण्याची वाट बघू लागला. सिंहाला हत्तीच्या सामर्थ्याचे माहीत होते म्हणून त्याने लांडग्याला खूप समजावले. तरी ही लांडगा काहीच ऐकतच नव्हता. 
तेवढ्यात तिथून एक हत्ती निघाला. झाडावर बसलेल्या लांडग्याने त्या हत्तीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा नेम चुकला आणि तो हत्तीच्या पायाखाली जाऊन पडला आणि चिरडला गेला. अशा प्रकारे लांडग्याने आपल्या मित्रा सिंहाची गोष्ट न ऐकल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागले.       
 
शिकवण- या कहाणीतून शिकवण मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीचा अभिमान किंवा गर्व करू नये आणि आपल्या जिवलग मित्राला कमी आखू नये.